निर्णय

                                                                                                निर्णय            
              आज तिच्या आधी घरी पोहचायचं होतं...आणि पोहचलोही. ती यायच्या आत घर आवरायचं होतं, याआधी कधी मी हे काम केलंच नाही. मुळात तिने कधी करू दिलच नाही...सुरूवातीला सोप्प वाटणारं काम जेव्हा करायला घेतल्यानंतर अशक्यप्राय वाटू लागतं, तेव्हा स्वत:च्या क्षमतेवर अविश्वास ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही. तरीही पाठ थोपाटण्या सारखं नसलं तरी क्षमतेपेक्षा चांगलं काम करण्याचा आनंद झाला..एवढचं!
काम आटपून टिव्ही पाहायला बसणार, तेवढयात सौभाग्यवतींची एन्ट्री झाली..रोज कुलूप उघडायची सवय असणाऱ्या आमच्या तिला आज बेल वाजवताना चुकल्यासारखं नक्कीच वाटलं असणार..याचा अंदाज बांधूनच दरवाजा उघडायला गेलो. आणि दरवाजा उघडताच तिचा पहिला प्रश्न "आज तुम्ही लवकर कसे?" परिक्षेत जसा तुम्ही पाठ करून गेलेलाच प्रश्न विचारावा तसा काहीसा हा प्रश्न होता..आणि मी सुद्धा पाठांतर केलेल्या मुलासारखं पटकन उत्तर देवून टाकलं..."काही नाही असंच! आज जास्त काम नव्हतं" तिच्या हावभावावरून तिला उत्तर पटलं नसावं हे मला लगेच जाणवलं. तरीही कोणताच प्रतिप्रश्न न करता सरळ ती तिच्या कर्मभूमी कडे वळाली.. म्हणजेच 'किचन'...किचन बऱ्यापैकी आवरलेलं दिसल्यावर तिला आश्चर्य वाटणार हे देखील मला माहीतच होतं... त्यानंतर बेडरूम, त्यानंतर हॅाल..."हे तुम्ही सगळं का करत बसलात, मी आवरलं असतं ना" हा प्रश्न सुध्दा पाठांतरातला..."अगं, आज लवकर आलो आणि काहीचं काम नव्हतं करायला म्हणून केलं"...मी सरळं सरळं थापा मारतोय हे तिच्या लक्षात आलं असावं हे मला जाणवलं...तरीही काहीच प्रतिक्रिया नाही...चुकल्यासारखं वाटलं रावं!...आज ती थोडी अपसेटच वाटली...आणि ती आज खुश असेल हा अंदाजच चुकला.. तरीही तिला खुश करण्याची अजून एक संधी शिल्लक होती. आणि त्याच संधीचा फायदा उठवण्याच्या आवेगात म्हणालो की, "आज आपण बाहेर जाणार आहोत जेवायला"
"का? मी बनवते ना लगेच, इतका काही वेळ नाही झाला मला" ती शांततेतच बोलली.
 "अगं वेळेचं नाही, आज स्पेशल डे आहे" बहुधा तिला कळालं असावं...आज काय स्पेशल आहे ते...मी लगेच म्हणालो, "तू पटकन आवर, आपल्याला थोड्याचं वेळात निघायचयं" तिने होकार दिला पण तिचा होकार फक्त माझ्या खुशीसाठी असावा,असं वाटलं...पण काय फरक पडतो...
         तिनेही लगेच आवरलं, या सवयीसाठी मात्र ती इतर स्त्रीयांना नक्कीचं अपवाद आहे...आम्ही जायला निघालो.. बाहेर जाताना नेहमी उत्साही असणारी ती.. आज मात्र शांत गाडीवर बसली होती... ही शांतता मला मात्र खूप बोचत होती...म्हणून मी विचारलंच "काय झालं? आज एवढी शांत का?" आणि यावर तिचा अपेक्षित रिप्लाय "काही नाही"...या काही नाही च्या मागे खुप काही आहे हे मी ओळखून होतो.. म्हणून काहीच न बोलता गाडी चालवायला लागलो, थोड्याच वेळात अपेक्षित स्थळी पोहचलो; तिला पुन्हा एकदा चकीत करण्याच्या उद्देशाने...! गाडी थांबवताच तिचा प्रश्न "आपण इथे का आलो आहोत? तुम्हाला माहीतेय ना, हे किती महागडं हाॅटेल आहे ते?" 
"मग काय झालं, एका वेळच्या जेवनासाठी आपण अफोर्ड करू शकतो...dont worry" 
"नको, आपण दुसरीकडे जावू..जास्त पैसे खर्च करण्याची काही गरज नाही" ती ओरडली.
मी काहिच न बोलता तिचा हात पकडला आणि गेलो घेवून आत...टेबल आधीच बुक होता. टेबलवर बसताच वेटर जवळ आला आणि मी तिला न विचारताच आॅर्डर देवून टाकली कारण मेनू कार्ड जर तिच्या हाती असतं तर तिने त्यातली सर्वात कमी किंमत असलेली डिश आॅर्डर केली असती...शेवटी बायकोच ती..! नवऱ्याचा फाटलेला खिसा त्याच्याआधी तिला दिसतो. मग तो पैशाने फाटलेला असो किंवा इतर कारणाने...ती लगेच ओळखते. असो..!
          आता वेळ आणि जागा परफेक्ट होती.. मी काही बोलनार तेवढ्यात ती म्हणाली "माझ्या लक्षात आलयं कि तुम्ही हे का करताय?" 
"मग हे सर्व तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल मला" मी ओघवत्या स्वरात बोललो...आणि ती सुरू झाली "मला प्रमोशन भेटलय आज...पण त्याचबरोबर माझी ट्रान्सफर सुध्दा झालीये..पुण्याला..." ती बोलता बोलता थांबली आणि लगेच मी तिला congrats केलं...ती उत्तरली "thanks but मी हे प्रमोशन घेणार नाहीये.." 
          सकाळपासून जे अंदाज बांधत होतो त्यातला जो अंदाज खरा होवू नये असं वाटत होतं;तो हाच.
मी शांतपणे विचारलं "तू का घेणार नाहीस?" 
ती उत्तरली "मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही" हे उत्तर ऐकल्यावर नवऱ्यावर असणारं प्रेम पाहून खुश व्हावं कि ती माझ्यासाठी पद नाकारतेय हे ऐकून दु:खी व्हावं हेच कळत नव्हतं..
"एकटी रहायला घाबरतेस का?" परिस्थितीचं गांभीर्य कमी करण्याचा भाबडा प्रयत्न.
"मी एकटी रहायला घाबरत नाही...तुम्हाला एकटं सोडायला घाबरते...साधा कूकर तरी लावता येतो का तुम्हाला...?" ती चिडत म्हणाली.
तिच्या बोलण्यात वास्तविकता होती पण ती बदलली जावू शकते हा आत्मविश्वास मला होता...तिला माझी काळजी वाटत होती...घरकामापैकी काहीही न जमणारा आपला नवरा, आपण नसल्यावर काय करेल याची चिंता तिला सतावत होती...शेवटी बायकोच ती.. पण अदिती अशी नव्हती... तल्लख बुध्दिमत्तेची आणि तितकीच मेहनती मुलगी, कामावर निष्ठा असणारी एक independant girl...पण जेव्हा घरच्यांचा विरोध पत्करून ती माझी बायको बनून या घरात आली. तेव्हापासून तीने आपल्या साऱ्या prioritise बदलून टाकल्या...समायोजन ही नवीन संकल्पना तिच्या आयुष्यात रूजली..स्वत: पेक्षा जास्त माझा विचार करू लागली, या घराचा विचार करू लागली...आजही नवरा आणि काम यापैकी तिने नवरा निवडला..नवरा म्हणून जिंकलो मी पण तिचा सोबती म्हणून हरलो...कारण हया पदावर पोहचणं हे तिचं स्वप्न होतं..आणि हे स्वप्न पूर्ण होण्याच्या आणि न होण्याच्या मध्ये मी उभा आहे...तिचा नवरा..! तिच्या पायातला तो अवजड साखळदंड बनून जो ती पायात घेवून पुढे चालूचं शकत नाही.. पण मला आत्ता तिचा सोबती व्हायचयं...तिच्या या यशात तिच्या सोबत रहायचयं...आजपर्यंत तिने घर सांभाळलं आता मला सांभाळयचयं...कारण संसार आमच्या दोघांचा आहे...नेहमी त्याग फक्त तीनेच का करावा...? सोबती म्हणून मी ही तयार आहे..फक्त आता तिचा निर्णय मला बदलावयाचा आहे...तो ही मी नक्की बदलवेन...विश्वास आहे मला...
            तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आत्ता माझ्याकडे नव्हतं...पण एक गोष्ट माहितेय की कूकर लावणं म्हणजे राॅकेट सायन्स नाही...तेही मी शिकेन...आणि ती प्रत्येक गोष्ट शिकेन ज्याच्यासाठी तिने आपला निर्णय बदलला...कारण तिचा निर्णय मला बदलवायचा आहे..असो!
           या सर्व विचारांसोबत जेवण कधी झालं कळालंच नाही...आणि घराकडे जाणारा रस्ता सुध्दा दोघांच्या शांततेत कधी संपला हे ही कळालं नाही...पण ती शांतता फक्त बोलण्यातली होती...मन मात्र अशांतच होतं...मी निर्णय बदलणार नाही या विचारात ती... आणि तिचा निर्णय कसा बदलू या विचारात मी...किती विरोधाभासी असतं ना...हे नवरा-बायकोचं नातं....
                                                                -अभि

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नायिका

पत्र...

शून्य...