थोर आणि विद्वान व्यक्तिरेखेवर काळाने अलगदपणे पडदा टाकला.
प्रतिभाशाली नाटककार गिरीश कर्नाड गेले. नाटकाच्याच भाषेत सांगायचे तर एका थोर आणि विद्वान व्यक्तिरेखेवर काळाने अलगदपणे पडदा टाकला. तथापि, या जागतिक रंगमंचावर तळपणाऱ्या असामान्य व्यक्तिरेखेवर कायमचा पडदा टाकणे साक्षात काळाला तरी शक्य आहे काय? आज काळाने झाकला तो केवळ कर्नाड यांचा अचेतन देह. मात्र कर्नाड यांनी नाटय़सृष्टीसाठी जे अलौकिक कार्य करून ठेवले आहे, तो अद्भुत ठेवा आणि त्यांनी नाटय़क्षेत्रावर केलेला संस्कार सदैव सचेतन राहील. बहुआयामी, बहुढंगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या गिरीश कर्नाड यांच्याकडे गुणवैशिष्टय़ांचा इतका जबरदस्त साठा होता की, या प्रत्येक गुणवैशिष्टय़ातून एक अद्वितीय व्यक्ती जन्माला आली असती. गिरीश कर्नाड काय नव्हते? ते एक उत्कृष्ट नाटय़लेखक होते, उत्तम नट होते, नाटय़विश्वाला नवी दृष्टी देणारे नाटय़दिग्दर्शक होते. त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मराठी, हिंदी चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाची छापही त्यांनी पाडली.
डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील मंडळींसाठी आधारस्तंभ असलेले गिरीश कर्नाड उजव्या विचारसरणीला कायम शिंगावर घ्यायचे. असहिष्णुतेचा डांगोरा पिटत मध्यंतरी पुरस्कार वापसीची लाट आली, तेव्हा कर्नाड सरकारविरुद्ध उभे ठाकले. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सरकारवर तुटून पडले.मर्त्य दुनियेचा ‘उंबरठा’ ओलांडून ते दुसऱ्या दुनियेत गेले असले, तरी तिथेही दंभस्फोट करणारे एखादे नवे महानाटय़ रचल्याशिवाय ते राहणार नाहीत. इथेही त्यांच्या अजरामर नाटय़कृतींचा रंगमंचावरील पडदा सतत हलता ठेवणे, हीच गिरीश कर्नाड यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल!, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरीश कर्नाड यांच्या आठवणींना उजाळा दिला.
Comments
Post a Comment