बालपण...

"बालपण"
                         काल मी माझ्या लहानपणीचे फोटो न्याहळत होतो. खूप वेळ एकच फोटो पाहत होतो...बटन तुटलेला शर्ट, अस्ताव्यस्त केस, अनवानी पाय तरीही ऐटीत उभा राहीलेला एक गोंडस मुलगा...खूप हेवा वाटला मला माझ्याच बालपणाचा.
                         असं का वाटलं असावं मला? आणि पुन्हा पुन्हा तेच फोटो पाहणं...! यावर थोडा विचार केला. आणि मग लक्षात आलं कि, मी त्या फोटोत काय शोधत होतो..?आणि का मला ती गोष्ट हवीहवीशी वाटतेय..?
मी त्या फोटोत माझं निश्चिंत आणि निरागस बालपण शोधत होतो. कसलीही काळजी न करता बागडणारा 'मी' शोधत होतो. हसू आल्यावर हसणारा आणि रडू आल्यावर जोराने रडणारा एक मुलगा शोधत होतो. दिवसभर बेधुंद फिरणारा आणि रात्री आईच्या कुशीत झोपणारा एक हळवा बालक शोधत होतो.
                      आणि तो मला कुठेतरी आठवणींच्या ठेवीत सापडलाही...आणि त्यासोबत सापडलं.."माझं बालपण..." पण खंत एवढीच की ते मला सोडून कधीच निघून गेलय..तेही न सांगता..! आणि आत्ता माझ्याकडे आहे ''तारूण्य'...       जे सळसळत्या रक्ताचं आहे... जबाबदारीचा बोजा खांद्यावर वाहण्याचं आहे, मित्रांवर जीव ओवाळून टाकण्याचं आहे, काहीतरी करून दाखवण्याचं आहे...तारूण्य म्हणजे शक्ती...प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याची ताकत.
                      पण तरीही या ताकती देहापेक्षा ते बालपणीचं कोवळं मन का अधिक प्रिय वाटतयं..? का ह्या सळसळत्या रक्ताला तो बालपणीचा मंद वेग हवायं..? स्वच्छ आणि नेटनेटक्या कपड्यांपेक्षा का मला बटण तुटलेला तो मळकट शर्ट आठवतोय..? अनवानी चालताना टोचलेल्या खड्याची वेदना पायात घातलेल्या शूज कडे बघून का होतेय.  या साऱ्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे नसण्याचं दु:ख नाहीये तर हातून काहीतरी निसटून गेलंय आणि पुन्हा ते कधीच भेटनार नाही याचं शल्य मात्र बोचतयं...आणि ते आयुष्यभर बोचेल...
                  या विचाराबरोबरच हातातला अल्बम झटकन बंद केला...मात्र आठवणींचा अल्बम तसाच चालू राहीला...एखादया चित्रफिती सारखा...
                                                                                                                                                      -अभि

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नायिका

पत्र...

शून्य...