प्रिय मुलीस...
प्रिय मुलीस,
आज खूप दिवसांनी कोणालातरी पत्र लिहतोय, मला माहितेय या digitalization च्या जमान्यात सुध्दा मी हे पत्रासारखं कालबाहय माध्यम वापरतोय याचं तुला आश्चर्य वाटेल.. पण कसं असतं ना की कितीही प्रगत भाषेत तुम्ही बोलत असला, तरी ठेच लागल्यावर मातृभाषेतच वेदना व्यक्त होते. असचं काहीसं समज..असो..! उद्देश एकच, मानातल बोलता यावं...
तुला आठवतं लहानपणी तू रात्रीच्या जेवणासाठी माझी वाट बघत बसायचीस आणि मी आल्यावर आपण दोघे एकाच ताटात एकमेकांना घास भरवत जेवायचो. मला माहिती नाही आता मेस मध्ये जेवताना याची तुला आठवण होते की नाही..पण मी मात्र रोज जेवताना त्या चिमुकल्या घासांना आठवत असतो..आणि नकळत फोन कड़े हात जातो.. आणि पहिला प्रश्न "जेवलीस का बाळा?" या प्रश्नाच उत्तर "हो" किंवा "नाही" हेच असतं मलाही माहितेय..पण अर्थ मात्र त्याचा तेवढाच नसतो, जेवताना एकदा तरी माझी आठवण झाली का?" असं विचारायचं असतं..थोडासा स्वार्थीपणा, बाकी काही नाही...
मागे तुमचं ते फेसबुक की काय, त्यावर account उघडलं होतं.. तुला friend request सुद्धा send केली, तू accept ही केलीस..वाटलं की तिथे तू तुझ्या बाबां बरोबर भरभरून बोलशील, पण तसं काही झालाचं नाही, वाटलं होतं पिढीनुसार बोलण्याची माध्यम बदलली असतील..पण तसं काही नव्हतं..तर वयानुसार priority list बदलेली..आणि त्याच prioroty list मध्ये "बाबा" नावाचा friend तळालाच राहिला..असो..!
लहानपणी सायकल शिकताना सुरुवातीला तू पडली होतीस..तुला पडण्याचं दुःख नव्हतं, तर बाबांनी सायकल का सोडली? याची खंत होती..आजही बेटा मी तेच करतोय, घरापासून तुला दूर सोडताना तू तुझ्या आयुष्याची सायकल एकटीने चालवावी, हीच इच्छा आहे.. पण मी त्यावेळीही आणि आत्ताही तुझ्या मागेच उभा आहे, फक्त तुझी सायकल धरली नाही. आणि आजही तू पडशील हीच काळजी मनाला लागून राहते.. शेवटी बापाचं मन ते..तुला नाही समजणार.
तू घरापासुन दूर रहावं.. चांगलं शिक्षण घ्यावं, तू तुझ्या पायावर उभं रहावं..आणि या समाजाच्या बंधनांना झुगारुन तू तुझं अस्तित्व निर्माण करावं हीच माझी इच्छा होती.. आणि बाळा तू तशी आहेस देखील..पण हे सर्व करत असताना आपण कुठेतरी आपल्या पालकांना गृहीत धरायला लागतो..पण काय आहे ना की, जशी तू मोठी होतेयसं तसे आम्ही सुद्धा म्हातारे होतोय.. हे विसरु नको..आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोतच पण तू आमच्यासोबत असावं असं वाटत राहतं...ह्या वयात पालकांपेक्षा मित्रांची सोबत हविशी वाटते...एवढं मानसशास्त्र समजतो मी..पण त्याचबरोबर आमची देखील भूमिका तुझ्या आयुष्यात तितकीच महत्वाची आहे हे तू समजून घ्याव असं मला वाटतं..बाकी तू समजदार आहेस..
ज्यावेळी तुला लहानपणी राजकुमार आणि राजकुमारी ची गोष्ट सांगायचो त्यावेळी मला त्या गोष्टीचा शेवट कधीच आवडायचा नाही. कारण त्यात शेवटी राजकुमार राजकुमारी सोबत सुखाने राहतो असं असायचं..आणि लहानपणापासून ज्या राजाने राजकुमारी ला तळहाताच्या फोडाप्रमाने संभाळालं तो मात्र त्यात कुठेच नसतो...
हे सर्व तुला सांगून तुला भावुक वगैरे करायचा हेतु नाही..फक्त एक वडील या नात्याने तुझ्याशी थोड़ं बोलायच होतं,वडील या विषयावर...मनात साचलेलं बाहेर काढायंच होतं..आशा करतो तू मला समजून घेशील. आणि हो तुला आमच्या पीढीतलं हे पत्र नावाचं माध्यम कसं वाटलं हे पत्र लिहून कळवं...कारण यात ना शब्दांची मर्यादा, ना भावनांची...वाट पाहीन!
तुझाच,
बाबा

Comments
Post a Comment